नांदेड, दि. ७ ऑक्टोबर : बाल विकास प्रकल्प कार्यालय, नागरी प्रकल्प नांदेड शहर अंतर्गत देगलूर नाका बीटमध्ये ८ वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ मोठ्या उत्साहात आणि जनजागृतीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रम्हपुरी चौफाळा चौक येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर अंगणवाडी सेविकांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून पोषण विषयक संदेश लोकांपर्यंत पोहोचविला. श्रीमती मीनाक्षी सोने यांनी वासुदेवाच्या वेशात सन २०२५ मधील “पोषण माह”च्या विविध थीम्सची माहिती दिली. श्रीमती संगीता माड यांनी भारूड या लोककलेच्या माध्यमातून ICDS योजनेतील सेवा, तसेच भरड धान्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. श्रीमती संगीता गाजलवाड यांनी निरोगी आरोग्यासाठी आवश्यक फळे व भाज्यांचे महत्त्व गाण्यातून सादर करून उपस्थितांना प्रेरित केले.
‘Vocal for Local’ या थीम अंतर्गत ग्रामीण जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. तर ‘पोषण भी पढ़ाई भी’ या थीमनुसार लाभार्थी बालकांनी व महिलांनी शिक्षणासह पोषणाचे महत्त्व वेशभूषेद्वारे साकारले. किशोरी मुलींच्या रॅली व लेझीम सादरीकरणाने परिसरात पोषण जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्यसेविका श्रीमती सुषमा शिसोदे यांनी केली. अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी बाल संगोपनात पुरुषांचा सहभाग, संतुलित आहाराचे महत्त्व व आरोग्यदायी सवयी विकसित करण्याची गरज अधोरेखित केली.
या प्रसंगी मुख्यसेविका श्रीमती गुंडारे यांनी महिलांना आरोग्य, स्वच्छता व पोषणाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस पाटील सिरमेवार यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कार्याचे कौतुक करत जनजागृतीसाठी त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका वर्षा गवारे, अश्विनी महल्ले, विजया जाधव तसेच सर्व सेविका व मदतनिसांनी एकत्रित परिश्रम घेतले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा उपक्रम पोषण, आरोग्य आणि शिक्षण या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देऊन जनतेच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.












