नांदेड, दि. 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी) —
नांदेड पोलिस दलाकडून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन समाधान’ उपक्रमांतर्गत आज शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेत स्थानिक व वरिष्ठ अशा एकूण 317 अर्जांची प्रभावीपणे निकाली काढणी करण्यात आली.
पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रत्येक शनिवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या दिवशीच निवारण करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारींचे निपटारे करण्यात आले.
पोलिस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी आज भग्यानगर पोलिस ठाण्यात स्वतः उपस्थित राहून 41 तक्रारींचे निवारण केले. त्यांच्यासोबत अपर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांनी देखील सहभाग नोंदवला. तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी त्यांच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन तक्रार निवारण केले.
एकूण 238 स्थानिक अर्ज व 79 वरिष्ठ स्तरावरील अर्ज अशा मिळून 317 अर्ज निकाली काढण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत दर शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली कोणतीही तक्रार असल्यास या वेळेत संबंधित पोलिस ठाण्यात येऊन निवारणासाठी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी केले आहे.
या उपक्रमाद्वारे पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असून तक्रारींचे त्वरित निवारण होऊन नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने केले असून, या उपक्रमात अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक व अधिकारी-अमलदार यांनी सहभाग घेतला.












