नांदेड, दि. 1 नोव्हेंबर :(प्रतिनिधी) माधव वाघमारे नैसर्गिक वाळूवरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने “एम-सॅंड” (कृत्रिम वाळू) उत्पादन प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजक, सहकारी संस्था, महिला बचत गट, युवक आणि कृषी-आधारित उद्योगांनी पुढे येऊन एम-सॅंड प्रकल्प उभारावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी काल (दि. 31 ऑक्टोबर) लोहा येथील एम-सॅंड प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पाची प्रक्रिया, उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, पर्यावरणीय मानदंड आणि बाजारपेठेतील मागणी यासंबंधी त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, “शासनाच्या औद्योगिक, पर्यावरणीय आणि उद्योजकता प्रोत्साहन योजनांतर्गत एम-सॅंड प्रकल्पांना वित्तीय सहाय्य, मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत प्राधान्याने दिली जात आहे. पर्यावरणपूरक विकासासाठी एम-सॅंड हा काळाची गरज असून, यामुळे नैसर्गिक वाळूचे संरक्षण, बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता व उपलब्धता वाढविणे, तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळणार आहे.”
एम-सॅंड प्रकल्पामुळे जिल्ह्यात युवक-उद्योजकांना नवी व्यवसाय संधी निर्माण होणार असून, बांधकाम क्षेत्रात टिकाऊ व पर्यावरणास अनुकूल पर्याय उपलब्ध होणार आहे.
एम-सॅंड (कृत्रिम वाळू) युनिटसाठी मंजूर खाणपट्टा असलेले, तात्पुरता परवाना असलेले किंवा खाणपट्टा नसलेले इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज 2 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र, पर्यावरण विभाग आणि पंचायत राज संस्था यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
एम-सॅंड पर्यावरणपूरक बांधकामासाठी टिकाऊ पर्याय!












