प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड : ११ मार्च पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 9 आणि 10 मार्च 2026 रोजी शहराच्या विविध भागात ही मोहीम राबविण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील पाच वेगवेगळ्या भागात छापे टाकले. पथकाने एकूण 17 इसमांवर कारवाई केली असून, त्यापैकी 14 जणांवर शांतता भंग केल्याप्रकरणी कलम 110/117 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सर्वाधिक कारवाई नांदेड ग्रामीण भागात करण्यात आली. येथे एम.आय.डी.सी.सनि चौक येथे पेट्रोलिंग दरम्यान 5 इसम दारू पिऊन शांतता भंग करताना आढळून आले. याशिवाय याच भागात 4 इसम दारूबरोबर चकना (भाजलेले धान्य) व पाणी पाउचची विक्री करताना सापडल्याने त्यांच्यावर कलम 68 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर भागात झालेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे:
शिवाजीनगर : स्टेडियम परिसर व अण्णाभाऊ साठे चौक येथे 3 इसमांवर कारवाई
भाग्यनगर : भवानी चौक, तुळजाभवानी चौक व जिरायत मैदान येथे 4 इसमांवर कारवाई
विजराबाद : कलामंदिर परिसरात 2 इसमांवर कारवाई
दामिनी पथक : विसावा गार्डन येथे 3 इसमांवर कारवाई
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये तसेच अशा कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेदरम्यान सर्व हद्दीतील दारूची दुकाने, वाईन शॉप आणि हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.












