नांदेड ८ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरातील आनंदनगर रोडवरील विद्युतनगर चौक भागात ‘लोटस स्पा सेंटर’च्या (Lotus Spa Center) नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्रासह आसाम राज्यातील ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी पंच आणि एका बोगस ग्राहकाचा वापर करून छापा टाकण्याची योजना आखली. बोगस ग्राहकाला ५०० रुपयांच्या आठ नोटा (एकूण ४,००० रुपये) देऊन स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे अवैध कृत्य सुरू असल्याची खात्री होताच, बोगस ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. त्यानंतर ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९:०० वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकला.
२० टक्के भागीदार जाळ्यात, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू छाप्या दरम्यान घटनास्थळावरून गौरव राजकुमार सरपाते (वय २० वर्षे, रा. राहुलनगर, हनुमानगड, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपण या व्यवसायात २० टक्के भागीदार असून पवितसंघ आरतीया (महाराज) हा ८० टक्के भागीदार असल्याचे व दोघे मिळून हा कुंटणखाना चालवत असल्याचे उघड केले.
मु मुद्देमाल जप्त व गुन्हा दाखल या कारवाईत पोलिसांनी बोगस ग्राहकास दिलेले ४,००० रुपये रोख आणि ५०,००० रुपये किमतीचा आयफोन १४ प्रो (Apple iPhone 14 Pro) असा एकूण ५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नंबर ३६८/२०२६ कलम ४, ५, ६ व ७ (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पथकाची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, तसेच पोलीस अंमलदार मधुकर टोनगे, रितेश कुलथे, गणेश लोसरवार, कवठेकर, अच्युत मोरे, केंद्रे, दिपा कठारे, कांचन शिंदे व देवकी पवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांनी आपल्या परिसरात असा कोणताही संशयास्पद किंवा अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षाकडे द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.












