नांदेड १४ ऑगस्ट (प्रतिनिधी: माधव वाघमारे) जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व आरोग्य योजना आणि उपक्रमांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. आरोग्य सेवा पुरवण्यात किंवा कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्स (DTF), माता मृत्यू व बाल मृत्यू अन्वेषण समिती तसेच नियमित लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत रिठे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीतील प्रमुख मुद्दे व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:
- कामातील निष्काळजीपणा खपवून घेणार नाही: सर्व आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील दिलेली उद्दिष्टे मुदतीत पूर्ण करावीत. कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले.
- एचपीव्ही (HPV) लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करा: १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणास ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मुलगी या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा व ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करून १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश त्यांनी दिले.
- माता व बाल मृत्यूदर शून्यावर आणण्याचे आवाहन: गरोदर मातांची वेळेवर तपासणी (ANC), हाय-रिस्क मातांचे त्वरित निदान व योग्य वैद्यकीय उपचार सुनिश्चित करावेत. आवश्यकतेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षमतावर्धन आणि गुणात्मक प्रशिक्षण आयोजित करावे. जिल्ह्यात माता व बाल मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पूर्ण कटिबद्धतेने काम करावे.
- डिजिटल प्रणाली व लस साठा व्यवस्थापन:
- ‘यु-विन’ (U-WIN) डिजिटल पोर्टलवर प्रत्येक लसीकरणाची अचूक व वेळेत नोंद करण्यात यावी.
- ‘ई-विन’ (eVIN) प्रणालीद्वारे लस साठ्याचे रीअल-टाईम मॉनिटरिंग (Real-time monitoring) आणि लस साठवणुकीच्या तापमानावर कडक नियंत्रण ठेवावे.
- सार्वजनिक जनजागृतीवर भर: नियमित लसीकरण तक्ता, लसीचे महत्त्व आणि लसीकरणाचे ४ महत्त्वाचे संदेश (लसीचे नाव, पुढील तारीख, AEFI खबरदारी व आरोग्य कार्ड सोबत आणणे) याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.












