प्रतिनिधी १२ ऑक्टोबर माधव वाघमारे
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील अवैध गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत देगलूर नाका परिसरातून १,०६,२८४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून धाड
दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना, बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, देगलूर नाका भागातील सिटीझन गल्ली, तुराब नगर येथे एका इसमाने स्वतःच्या घरात विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटखा व पानमसाला साठवून ठेवला आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सायंकाळच्या सुमारास नमूद ठिकाणी छापा टाकला. पोलीस कारवाईदरम्यान साजीद खान इनायत खान (वय ३५ वर्षे, रा. सिटीझन गल्ली, तुराब नगर, देगलूर नाका, नांदेड) हा इसम आढळून आला.
१,०६,२८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता, तेथे पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये मानवी शरीरास कॅन्सरसारख्या दुर्धर आजारास कारणीभूत ठरणारा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान विमल पानमसाला, सागर पानमसाला, SR-1 सुगंधी तंबाखू, मुसाफिर पानमसाला असा विविध कंपन्यांचा एकूण १,०६,२८४/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपी साजीद खान इनायत खान याच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम २६, २७, ३०(२)५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव, आणि पोलीस उपअधीक्षक मा. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा पोलीस ठाण्याचे पोनि/सिद्धेश्वर कैलासे, पोउपनि/जळबाजी गायकवाड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार बंडू कलंदर, बालाजी हिंगणकर, शेख इसराईल व महिला अंमलदार शबाना यांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाचा इशारा: नांदेड जिल्हा पोलिसांकडून अवैध गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे.












