नांदेड १३ ऑक्टोबर (प्रतिनिधी – माधव वाघमारे)
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणारे भव्य शिबिर डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात उत्साहात पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात एकाच छताखाली विविध विभागांच्या सेवा, प्रमाणपत्रांचे वितरण, आरोग्य तपासणी आणि कल्याणकारी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.
या प्रसंगी तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्के, बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) शिवगंगा पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, सुनील माचेवाड, संजय नागमवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध प्रमाणपत्रांचे आणि दाखल्यांचे थेट वितरण
शिबिरादरम्यान आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना ३१ जातींची प्रमाणपत्रे, २८० रहिवासी प्रमाणपत्रे आणि १४५ उत्पन्न प्रमाणपत्रांचे तात्काळ वितरण करण्यात आले.
यासोबतच:
- ग्रामविकास विभाग: ३५ जन्मदाखले व ३५ मृत्यूदाखल्यांचे वाटप.
- महसूल विभाग: ७५ जिवंत सातबारा उतारे लाभार्थ्यांना सुपूर्द.
- पुरवठा विभाग: ५१ ऑनलाईन शिधापत्रिकांचे वितरण.
- कृषी विभाग: महिला सक्षमीकरणास चालना देण्यासाठी १२५ महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण. तसेच ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ आणि ‘महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ॲप’च्या वापराबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य तपासणी व विविध कल्याणकारी योजनांची माहिती
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने शिबिरात तब्बल ३५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने:
- आयुष्मान भारत योजना: २२५ नागरिकांना आरोग्य कार्डांचे वाटप.
- वय वंदना योजना: ६० वर्षांवरील ३५ ज्येष्ठ नागरिकांना वंदना कार्डांचे वितरण.
- इतर सेवा: अनुलोम संस्थेमार्फत ‘आभा कार्ड’ नोंदणी, महावितरण विभागामार्फत ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट नोंदणी व प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा
नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागू नयेत, या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून सर्व प्रमुख विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रमाणपत्रांचे वितरण, मोफत आरोग्य तपासणी आणि विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हे शिबिर अत्यंत प्रभावी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.












