नांदेड, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) –
शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहर वाहतूक शाखा व इतर पोलीस ठाण्यांनी मिळून अवैध प्रवासी वाहतूक करणारे, परवाना नसलेले चालक, बेदरकारपणे वाहन चालवणारे तसेच फटाका बुलेटचा वापर करणाऱ्यांवर संयुक्तपणे धडक मोहिम राबवून तब्बल ₹२,९१,६०० इतका दंड आकारला आहे.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या देखरेखीखाली ही विशेष कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे शहर वाहतूक शाखा अधिकारी व दंगल नियंत्रण पथक यांनी नांदेड शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, रेल्वे स्टेशन, कलमंदिर परिसर या ठिकाणी नाकाबंदी करून अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक व नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
या मोहिमेत १३० प्रकरणांतून एकूण ₹१,५९,५५० इतका दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, दुसरी कारवाई प्रभारी अधिकारी जगन्नाथ पवार पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा व इतरत्र यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत देगलूर नाका, जुना मोंढा, विवेक नगर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या दरम्यान १२६ प्रकरणांतून ₹१,३२,०५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
एकूणच दोन्ही कारवायांमधून २५६ प्रकरणांत एकत्रित ₹२,९१,६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान बेदरकारपणे वाहन चालवणारे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे, फटाका बुलेट वापरणारे तसेच वाहन परवाना नसलेले चालक यांना दंडित करण्यात आले.
पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.












