नांदेड, दि. १७ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०१७ अन्वये सुरू असून नांदेड जिल्ह्यासाठी सन २०२५–२६ करिता तालुकानिहाय उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहाय्यता बचत गटांना शेतीपूरक व्यवसायासाठी मिनी ट्रॅक्टर व आवश्यक उपसाधनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील बचत गटांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होऊन उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे.
योजनेसंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक ८ मार्च २०१७ अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र बचत गटांनी सन २०२५–२६ साठी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा.
ऑनलाईन अर्जाची सत्यप्रत आवश्यक कागदपत्रांसह दि. १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. पात्र बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
या योजनेमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील बचत गटांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळून त्यांना शेती व संलग्न व्यवसायात स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.












