नांदेड, दि. २६ सप्टेंबर : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्या अनुशंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती “अंत्योदय दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साले होते. त्यांनी एकात्म मानवदर्शन या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे संयम, समर्पण आणि कर्तव्यभावना यांसह समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांचे अखंड अवधान ठेवून चालणारे जीवन म्हणजेच एकात्म मानवदर्शन होय.
संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी आपल्या भाषणात समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी करणे ही त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याची संधी असल्याचे नमूद केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सतीश चव्हाण यांनी उद्योगासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रा.से. योजनेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर, हर्षद शहा, प्रेमानंदजी शिंदे, धीरज बिडवे (व्यवस्थापन समिती सदस्य), मनोज जाधव (सामाजिक कार्यकर्ते), सुधीर एकलारे (सामाजिक कार्यकर्ते, देगलूर) तसेच सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पोतदार (रा.से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. आभार व्ही. पी. भोसीकर (गटनिदेशक) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.












