नांदेड, दि. ३ ऑक्टोबर : यावर्षीपासून पीक विमा योजनेत नुकसानभरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यातील मौजे ढोकी येथे आज सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.
हा प्रयोग तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थितीत पार पडला. यासाठी शेतकरी गोविंद संभाजी चपाट यांच्या शेतातील १० x ५ मीटरचा प्लॉट निवडण्यात आला. निवडलेल्या प्लॉटमधील सोयाबीन पिकाची कापणी केली असता एकूण ७ किलो उत्पादन मिळाले. त्यानंतर मळणी प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष सोयाबीन दाण्यांचे २.०७५ किलो उत्पादन मिळाले.
सदर सोयाबीन पिकाचे मॉइश्चर मशीनद्वारे आर्द्रता मोजली असता १७.६ टक्के आर्द्रता आढळून आली. आर्द्रतेच्या प्रमाणानुसार उत्पादनाच्या वजनात घट होणार असल्याचे नोंदविण्यात आले.
या पीक कापणी प्रयोगावेळी तहसिलदार संजय वारकड यांच्यासह सरपंच सौ. मीनाबाई पांचाळ, उपसरपंच श्री. भगवानराव डाखोरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी गोपीनाथ थोरात, मंडळ अधिकारी (लिंबगाव) श्री. जगताप, ग्राम महसूल अधिकारी श्री. ब्रीदाळे, ग्रामविकास अधिकारी टी. एन. केंद्रे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. मोरताडे, पोलीस पाटील श्री. कांतराव लबडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.












