नांदेड, दि. ९ ऑक्टोबर – येत्या दिपावली सणानिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या तात्पुरत्या फटाका परवान्यांबाबत अर्ज स्वीकृतीची मुदत वाढविण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने याबाबत १५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर प्रगटन करण्यात आले होते. त्यामध्ये १६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ असा अर्ज स्वीकृतीचा कालावधी नमूद होता. मात्र व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी हा कालावधी आता वाढवून १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत करण्यात आला आहे.
दिपावली उत्सव यावर्षी १७ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. त्यानुसार नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाने सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये संबंधित उपविभागीय कार्यालयांमार्फत स्वीकृत केले जातील.
फटाका परवाने हे विस्फोटक अधिनियम २००८ नुसारच दिले जाणार असून, १५ सप्टेंबरच्या प्रगटनातील इतर सर्व अटी व शर्ती यथावकाश लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे फटाका विक्रेत्यांना आणि तात्पुरत्या परवाना अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून, अर्ज सादरीकरणासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे.












