नांदेड १९ जानेवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड शहरात ‘हिंद-दी-चादर’ ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील ५२ एकर परिसरात हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या शहीदी समागमासाठी ८ ते १० लाख भाविक देश-विदेशातून उपस्थित राहण्याची शक्यता असून, कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमस्थळी ५२ एकरांवर गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती, भाविकांसाठी ८ महालंगर, ३५० हून अधिक स्टॉल्स तसेच विविध प्रदर्शन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय देश-विदेशातील मान्यवर, धर्मगुरू आणि प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार असल्याने नांदेडचे नाव जागतिक पातळीवर उजळणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. वाहतूक, पार्किंग, सुरक्षा, आरोग्य व स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असून, सेवाभावी संस्थांना स्टॉल्ससाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा शहीदी समागम कार्यक्रम धर्म, त्याग, मानवता आणि एकतेचे प्रतीक ठरणार असून, नांदेडच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला देखील चालना मिळणार आहे. भाविकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नांदेड पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे.












