नांदेड, दि. ५ नोव्हेंबर २०२५ (प्रतिनिधी): माधव वाघमारे
शहरातील वाहतुकीची वाढती समस्या, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारी गैरसोय, तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिस प्रशासन व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे आज मोठी कारवाई राबविली. बाफणा टी पॉईंट ते देगलूर नाका या मुख्य मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्यात आले.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक श्री. रणजीत भोईटे व पोलिस स्टेशन इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दल व महानगरपालिकेच्या विशेष पथकाने दुकानदार व फेरीवाल्यांनी रस्त्यावर केलेली टपरी, शेड, बॅनर, फळ ठेले, तसेच अन्य भौतिक अतिक्रमण हटविले.
मोहिमेदरम्यान ५० पेक्षा जास्त अतिक्रमणे काटेकोरपणे काढण्यात आली. अतिक्रमणामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.
या कारवाईत महानगरपालिका उपायुक्त श्री. अजीतपाल सिंग, सहाय्यक आयुक्त श्री. सोनसाळे, पोलिस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, अमलबजावणी विभाग व इतर कर्मचारी सहभागी झाले.
पोलिस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
“शहर स्वच्छ, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुलभ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई पुढेही सुरु राहील.”
नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.












