नांदेड, दि. २ नोव्हेंबर प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड पोलिस दलाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्यासाठी “मिशन समाधान” या उपक्रमांतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत आजपर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण 239 अर्जांची प्रभावीपणे सुनावणी करून निपटारा करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दर शनिवारी तक्रार निवारण मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील सर्व ठाण्यांमध्ये प्रलंबित अर्जांची संख्या लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आजच्या तक्रार निवारण दिनानिमित्त अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांनी नांदेड शहर व ग्रामीण परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तक्रारींची तपासणी करून मा.पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी निवारण केले.
या मोहिमेद्वारे नागरिकांना त्यांच्या तक्रारींचा निपटारा सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे. पुढील काळातही दर शनिवारी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत नांदेड पोलिसांतर्फे अशी तक्रार निवारण मोहीम राबविण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकारी स्वतः पोलीस ठाण्यांवर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात आणि त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश देतात. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढीस लागला आहे.
या उपक्रमात पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.












