नांदेड १ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व समाजातील वाळू तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. याच अनुषंगाने वाळू तस्करीत सातत्याने सहभाग असलेल्या गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रतिबंधक असामाजिक क्रियाकलाप अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या प्रस्तावानुसार उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरलीधर प्रकाश ढगे (वय 28, व्यवसाय टिपर चालक, रा. येळी ता. लोहा जि. नांदेड) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नदीपात्रे खोल जाणे, शेती व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवून वाळू तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.
सदर गुन्हेगाराविरुद्ध यापूर्वीही अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या सततच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन एमपीडीए अंतर्गत ही स्थानबद्ध कारवाई करण्यात आली.
ही कारवाई जिल्हाधिकारी नांदेड मा. श्री. राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, साहेब सा.पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार पो नि गजानन गाडेकर कॉन्स्टेबल अशोक कुमार हंबर्डे विश्वनाथ बोरकर गंगाधर चिंचोरे प्रकाश मोरे यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत कारवाई केली उस्माननगर पोलीस ठाणे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात वाळू तस्करी, अवैध धंदे व समाजविघातक कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.












