नांदेड, दि. 19 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत निर्गमित व अभिलेखात नोंद असलेल्या शस्त्र परवान्यांची मुदत बुधवार, 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे संबंधित सर्व शस्त्र परवानाधारकांनी आपले परवाने पुढील कालावधीसाठी वेळेत नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी केले आहे.
शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी शासनाने निश्चित केलेले नुतनीकरण शुल्क नियमानुसार चलनाद्वारे शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. तसेच परवान्यात नमूद असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी जिल्हादंडाधिकारी कार्यालयात करून घ्यावी लागणार आहे.
नुतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्जासह जन्मतारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच मूळ शस्त्र परवाना सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित कागदपत्रांसह अर्ज मंगळवार, 23 डिसेंबर 2025 पासून जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड येथील संबंधित विभागात दाखल करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवाना धारकांनी वेळेत नुतनीकरण प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर अडचणी टाळाव्यात, असेही जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.












