श्रीक्षेत्र माळेगाव | नांदेड दि. 18 डिसेंबर
(प्रतिनिधी) माधव वाघमारे
“उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी…” या जयघोषात, बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने यंदाही श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्रीखंडोबा रायाच्या यात्रेला भव्य व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. देवस्वारी व खंडोबाच्या पालखी पूजनाने यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाखो भाविकांनी खंडोबाच्या पालखीचे दर्शन घेतले.
खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली. या वेळी पारंपरिक मानकरी व सेवेकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जि.प. माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, शिवानंद हेगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मानकऱ्यांचा सन्मान
पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकंदडे, आंबादास खंडेराव जहागीरदार यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने मानाचा फेटा, जोडआहेर देऊन सन्मान करण्यात आला.
वाघ्या–मुरळींच्या सेवेमुळे वातावरण भक्तिमय
खंडोबा यात्रेत वाघ्या–मुरळी, पोतराज व डफवाल्यांच्या सहभागाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. “नऊ लाख पायरी जेजुरी गडाला” असा घोष करीत कवड्यांच्या माळा, हळदीचा मळभट व पारंपरिक विधींनी वाघ्या–मुरळींनी खंडोबाची सेवा केली. ही सेवा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रशासन सज्ज; प्लास्टिकमुक्त व सुरक्षित यात्रा
भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्लास्टिकमुक्त व स्वच्छ यात्रेचा संकल्प राबविण्यात येत आहे. तसेच यात्रास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माधव सलगर, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यळकोट यळकोट जय मल्हार… च्या गजरात माळेगाव यात्रा उत्साहात सुरू झाली असून पुढील दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रेचा उत्सव अधिक रंगणार आहे.












