नांदेड, दि. 18 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी येथील क्ष-किरणशास्त्र विभागामध्ये अत्याधुनिक व उच्चक्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रगत वैद्यकीय सुविधेची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी भेट देऊन केली.
ही अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन अत्यंत जलद, अचूक व उच्च रिझोल्यूशन प्रतिमा देणारी असून अल्प वेळेत संपूर्ण शरीर तपासणी करण्याची क्षमता तिच्यात आहे. या यंत्राच्या सहाय्याने मेंदूचे आजार, स्ट्रोक, मेंदूतील रक्तस्राव, हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार, अपघातातील अंतर्गत दुखापती तसेच छाती व पोटातील गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांचे त्वरित व अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
या मशीनमध्ये आभासी ब्रॉन्कोस्कोपीची सुविधा उपलब्ध असून त्यामुळे फुफ्फुसांतील अंतर्गत गाठींचे अचूक निदान करता येणार आहे. तसेच शरीरातील विविध गाठींची बायोप्सी, अन्ननलिकेतील आजारांसाठी डायनॅमिक ओरल कॉन्ट्रास्ट अभ्यास, अर्धांगवायूग्रस्त रुग्णांमध्ये मानेतील व मेंदूतील रक्तवाहिन्यांची तपासणी या सुविधांचा समावेश आहे. अपघातग्रस्त रुग्णांचे संपूर्ण शरीर सिटी स्कॅन अल्प वेळेत करता येत असल्याने तातडीची व प्रभावी उपचार सेवा देणे शक्य होणार आहे.
पाठीच्या मणक्यांचे आजार, महिलांच्या गर्भाशयासह विविध अवयवांचे आजार तसेच लहान मुलांमधील दुर्धर आजारांचे अचूक निदानही या अत्याधुनिक यंत्राद्वारे करता येणार आहे.
या मशीनची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे –
अत्यंत कमी वेळेत (हाय स्पीड स्कॅनिंग) तपासणी,
कमी किरणोत्सर्गात उच्च दर्जाचे स्कॅन,
3D व 4D इमेजिंग सुविधा,
मेंदू, हृदय, फुफ्फुसे, पोट व संपूर्ण शरीराचे सविस्तर परीक्षण,
अपघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीने संपूर्ण शरीर सिटी स्कॅन,
हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे (CT Coronary Angiography) अचूक परीक्षण,
तसेच बालरुग्ण व वृद्ध रुग्णांसाठी सुरक्षित तपासणी व्यवस्था.
नांदेड जिल्ह्यात Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन असलेले हे एकमेव शासकीय रुग्णालय असून या सुविधेचा थेट लाभ जिल्ह्यासह परिसरातील हजारो रुग्णांना होणार आहे











