नांदेड १८ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
दक्षिण भारतासह महाराष्ट्रात श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र माळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथे सुरू असलेल्या श्री खंडोबा यात्रेला यंदाही लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. या पारंपरिक आणि ऐतिहासिक यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील राज्यांतून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र याच काळात नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र माळेगावला भेट न देता मुखेड तालुक्यात नगर परिषद निवडणुकांच्या प्रचाराला प्राधान्य दिल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात आले असतानाही, अवघ्या काही अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र माळेगावला भेट देण्यासाठी वेळ काढला गेला नाही. मुखेड तालुक्यात प्रचार सभा आटोपून मुख्यमंत्री थेट मुंबईकडे रवाना झाले. “प्रचारासाठी वेळ आहे, पण देवदर्शनासाठी नाही?” असा सवाल भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून परिसरातील लोकसंस्कृती, परंपरा आणि अर्थकारणाशी जोडलेली आहे. यात्राकाळात देवस्वारी, पालखी पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी प्रदर्शन, पशु व कुक्कुट प्रदर्शन आदी उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून जातो. अशा महत्त्वाच्या यात्रेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकणारी ठरली आहे.
स्थानिक भाविकांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री जिल्ह्यात येऊनही श्री खंडोबा रायाच्या दर्शनाला पाठ दाखवून परत जाणे हे माळेगावच्या लाखो भक्तांच्या भावनांना धक्का देणारे आहे. राजकीय कार्यक्रमांना महत्त्व देताना धार्मिक व सांस्कृतिक परंपरांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
दरम्यान, श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा उत्साहात सुरू असून प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहेत. मात्र मुख्यमंत्री भेट न दिल्याची चर्चा आणि नाराजी यात्राभर सुरू असल्याचे चित्र आहे.












