नांदेड ३ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी : माधव वाघमारे)
087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आजअखेर मतदारसंघातील तब्बल 99 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित केवळ 1,847 मतदारांचे काम शिल्लक आहे. हे काम पुढील तीन दिवसांत पूर्ण करून 100 टक्के उद्दिष्ट गाठले जाईल, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि बीएलए-1 (Booth Level Agent) यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
आढावा बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
या बैठकीत मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना खालील महत्त्वाची माहिती व दस्तऐवज पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले:
- गणना पत्रांचे वाटप व डिजिटायझेशन: मतदारसंघातील सर्व 312 मतदान भागांमध्ये गणना पत्रांचे 100% वाटप पूर्ण झाले असून, डिजिटायझेशनचे काम 78% पूर्ण झाले आहे.
- ‘अनकलेक्टेबल’ मतदारांची यादी: मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित, गैरहजर किंवा दुबार नोंद असलेले मतदार यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली आहे.
- नवीन मतदान केंद्र: प्रस्तावित नवीन मतदान केंद्रांची केंद्रनिहाय यादी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सोपवण्यात आली आहे.
17 ऑगस्टला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी
बैठकीदरम्यान डॉ. सचिन खल्लाळ यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व बीएलएंना विशेष आवाहन केले. ते म्हणाले:
“ज्या मतदारांनी विहित मुदतीत गणना पत्र सादर केलेले नाही किंवा ज्यांची नोंद ‘अनकलेक्टेबल’ म्हणून झाली आहे, अशा मतदारांचे गणना पत्र संबंधित बीएलओंकडे (BLO) जमा करण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत अशा मतदारांची नावे समाविष्ट होणार नाहीत. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित मतदारांना नंतर आवश्यक ते पुरावे सादर करावे लागतील.”
टीमवर्कमुळे मोहीम यशस्वी
विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) ही मोहीम अत्यंत किचकट आणि अवघड मानली जाते. मात्र, बीएलओ (BLO), पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तसेच विविध राजकीय पक्षांचे बीएलए (BLA) आणि प्रतिनिधी यांच्यातील उत्तम समन्वयामुळेच हे काम यशस्वीरीत्या पूर्णत्वाकडे जात असल्याचे डॉ. खल्लाळ यांनी नमूद केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी व राजकीय प्रतिनिधींचे अभिनंदन केले.












