नांदेड २० सप्टेंबर(विशेष प्रतिनिधी – माधव वाघमारे)
जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा आणि विविध विभागांच्या सेवांचा लाभ अधिक सुलभतेने व गतीने मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ भोकर तालुक्यातील ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ हाडोळी येथून करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा श्रीगणेश झाला.
अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी वृक्षारोपण, विविध दाखल्यांचे वाटप, घरकुलांना भेटी, महिला बचत गटांना कर्जाच्या धनादेशांचे वितरण आणि विविध शासकीय संस्थांची पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांना भेट देऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
एकही लाभार्थी वंचित राहू नये: सीईओ महेश पाटील यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील म्हणाले की, शासकीय यंत्रणेने केवळ कार्यालयापुरते मर्यादित न राहता थेट प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे. एकही पात्र घटक शासकीय सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्परांत समन्वय ठेवून काम करावे. गरोदर मातांच्या नोंदणीसाठी अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांनी प्रभावी समन्वय साधावा, तसेच ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजने’च्या लाभापासून एकही माता वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड नोंदणी वाढवणे, विद्यार्थ्यांची MBU नोंदणी पूर्ण करणे आणि प्रलंबित दाखले तातडीने देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आरोग्य उपकेंद्राच्या गळतीवरून कंत्राटदाराला ताकीद पाहणी दरम्यान हाडोळी येथील नव्याने बांधलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीमध्ये गळती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत, दोष दुरुस्ती दायित्व कालावधी अंतर्गत (Defect Liability Period) संबंधित कंत्राटदाराने ही गळती तातडीने दुरुस्त करून द्यावी, असे स्पष्ट व कडक निर्देश महेश पाटील यांनी दिले.
प्रशासकीय अधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती या कार्यक्रमास भोकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, उपविभागीय अभियंता शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी चाटलावर, शिक्षण अधिकारी तरवडे, विस्तार अधिकारी गोणशेटवार, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती गोवंडे, हाडोळीच्या माजी सरपंच अनिता माधवराव अमृतवाड, उपसरपंच अनुसयाबाई रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक दुधारे, विजयादशमी कृष्णुरे, संगीता रामराव भालेराव, दुर्गा हरिदास किनेवाड यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












