विशेष प्रतिनिधी: माधव वाघमारे ८ ऑगस्ट (नांदेड)
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी घडलेल्या बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यातील गेली तीन वर्षे फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातील बासर येथून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून ५ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेने ही चमकदार कामगिरी केली आहे.
तीन वर्षांपासून पोलीस मागावर दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ रोजी फिर्यादी प्रशांत प्रभाकर दहाळे (रा. सिडको, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींनी त्यांची बॅग चोरून (बॅग लिफ्टिंग) त्यातील सोन्याचे दागिने व मौल्यवान ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. मात्र, या प्रकरणातील अन्य तीन आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होते.
तेलंगणात सापळा रचून कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत दिलेल्या विशेष सूचनांनुसार, सपोनि रवी वाहुळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. आरोपी ओडिसा राज्यातील जाजपूर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांचा मागोवा घेतला. त्यानंतर आरोपी बासर (जि. निर्मल, तेलंगणा) येथे आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तेथे सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १) औला गंगा औला रामुल (वय ४० वर्षे, रा. पुराबाकोटे, जि. जाजपूर, ओडिसा) २) कंचना दास येशु दास (वय ४० वर्षे, रा. पुराबाकोटे, जि. जाजपूर, ओडिसा) ३) चिनबाबू रामू प्रधान (वय २३ वर्षे, रा. दसमनिया, जि. जाजपूर, ओडिसा)
ताबा घेतलेल्या आरोपींनी सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ५,००,३०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली यशस्वी कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोनि अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवी वाहुळे, पोउपनि माधव केंद्र, बळीरामदासरे, पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, ब्रम्हानंद लामतुरे, शेख उमर, दिलीप चंचलवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, महिला अंमलदार भाग्यश्री सूर्यवंशी (सर्व रा. स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार प्रतिभा तरटे, उज्वला सदावर्ते आणि सायबर सेलचे रेश्मा पठाण, राजेंद्र सिटीकर, दिपीक ओढणे यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.












