नांदेड १५ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वसंत नगर, नांदेड येथील ‘कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा’ येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम कुंटूरकर हे होते, तर उपाध्यक्ष कल्पना कुंटूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता तसेच संस्थापक अध्यक्ष स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी व त्यांचा उत्साह वाढवा, या उद्देशाने गणवेश आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी आणि उत्साहात पार पाडण्यासाठी संस्थेचे मुख्याध्यापक खंडागळे, वाडेकर, शुभम बिजमवार, गांजरे, पेडलवार, सौ. आरती भुरेवार, अजय कांबळे, तिरुपती गोदगे, इरफान अली, संगीता वाघमारे यांच्यासह इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी मुख्याध्यापक खंडागळे यांनी हा स्तुत्य उपक्रम व स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.












