नांदेड २२ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरात संघटित गुन्हेगारी करून सर्वसामान्य जनतेत दहशत माजवणाऱ्या आणि खून, खुनाचा प्रयत्न, जबरी खंडणी, सुपारी देऊन हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. नांदेड जिल्हा कारागृहातूनच गुन्हेगारीचे नेटवर्क चालवणाऱ्या टोळीप्रमुखांना व त्यांच्या साथीदारांना सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांत वर्ग (स्थलांतरित) करण्यात आले आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. विविध सराईत टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA – मोक्का) अंतर्गत कारवाई झालेली आहे. हे सराईत आरोपी नांदेड जिल्हा कारागृहात एकत्र असल्याने त्यांचे परस्पर संबंध टिकून राहणे, कारागृहातील अंतर्गत सुरक्षितता, प्रशासकीय अडचणी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेला निर्माण होणारा धोका लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी पोलीस महासंचालनालयाकडे विशेष प्रस्ताव पाठवला होता.
गृह विभाग, कारागृह व सुधारसेवा महासंचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या आदेशानुसार आणि मा. न्यायालयाच्या परवानगीने पुढील ७ सराईत गुन्हेगारांची इतर कारागृहांत रवानगी करण्यात आली आहे:
- कैलास जगदीश बिगामिया
- अनिल उर्फ पंजाबी सुरेश पवार
- साईसिंग उर्फ लाला दीपकसिंग गैरहवार
- ईश्वरसिंग जयवंतसिंग गीरणीवाले
- सुरेंद्रसिंग उर्फ सुरज जगतसिंग गाडीवाले
- आशु पाटील उर्फ कमलेश बालाजी लिंबापुरे
- मिर्झा शब्बरबेग मिर्झा गफार बेग
नांदेड जिल्हा व शहर परिसरात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या अथवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीची गय केली जाणार नाही. शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कठोर कायदेशीर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे.












