नांदेड २२ ऑगस्ट प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाने गोविंदनगर रोड येथे सापळा रचून विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२१ ऑगस्ट २०२६ रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोविंदनगर रोडवरून अवैध वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गोविंदनगर रोड परिसरात सापळा लावून संशयित हायवा टिप्पर (क्रमांक MH-26-BE-7105) अडवला. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही वैध परवाना नसताना अवैध रीतीने वाळूची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
जप्त केलेला मुद्देमाल:
- हायवा टिप्पर (MH-26-BE-7105): किंमत ₹४०,००,०००/-
- अवैध वाळू (५ ब्रास): किंमत ₹२५,०००/-
- एकूण जप्त मुद्देमाल: ₹४०,२५,०००/-
या प्रकरणी चालक माधव संभाजी सूर्यवंशी (वय ४० वर्षे, रा. येळी, ता. लोहा, जि. नांदेड) याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, धिरज कोमुलवार आणि राजानंद कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
जिल्ह्यात कुठेही अवैध गौण खनिज वाहतूक, साठवणूक किंवा उत्खनन आढळल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी; अशा अवैध कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












