नांदेड २० ऑक्टोबर जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, नांदेड ग्रामीण पोलिसांनी भनगी ते वाडीपाटी रोडवर धडक कारवाई केली आहे. विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या एका विनानंबर हायवा वाहनासह ४५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक जाधव यांना भनगी ते वाडीपाटी जाणारे रोडवर एका विनानंबर हायवा वाहनातून अनधिकृतपणे रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती.
या बातमीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित हायवा वाहनाला रोखले. वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात सुमारे ५ ब्रास रेती आढळून आली. वाहनातील चालकाकडे रेती वाहतुकीचे कोणतेही अधिकृत परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.
जप्त केलेला मुद्देमाल व गुन्हा दाखल : पोलीस पथकाने पंचनामा करून अंदाजे ४५ लाख रुपयांचे विनानंबर हायवा वाहन आणि २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास रेती असा एकूण ४५,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी अमित विठ्ठल गच्चे (वय २३ वर्षे, रा. बामणी, ता. लोहा) याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५८/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (७), (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक : ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस अंमलदार वाघमारे, माळगे, शेख व कांबळे (सर्व नेमणूक नांदेड ग्रामीण) यांच्या पथकाने पार पाडली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन : नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालू राहील. तरी नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर आणि अवैध कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने केले आहे.












