प्रतिनिधी: माधव वाघमारे दि २१ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने २० ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड शहरातील ईदगाह मैदान परिसरात कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अवैध गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
नेमकी काय आहे घटना?
स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/साईनाथ पुयड व त्यांचे पथक २० ऑक्टोबर २०२६ रोजी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नांदेड शहरात गस्त घालत होते. यादरम्यान ईदगाह मैदान परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या पिस्तूल बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून त्या संशयिताला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या तरुणाची विचारपूस केली असता त्याचे नाव अन्वर खान अमजत खान (वय २१ वर्ष, रा. खुदबेनगर, नांदेड) असे निष्पन्न झाले.
रु. ३६,०००/- किमतीचा साठा जप्त
पोलिसांनी संशयित आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सिल्व्हर रंगाचे एक गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र) व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. या जप्त साठ्याची अंदाजे किंमत ३६,००० रुपये आहे. सदर पिस्तूल बाळगण्यासाठी आवश्यक असणारा परवाना आरोपीकडे नव्हता.
अधिक चौकशी केली असता, हे पिस्तूल त्याने त्याचा मित्र आमेर अहमद खान उर्फ आमेर जिहादी उर्फ AMK महेफुज खान (रा. इकबाल नगर, नांदेड – सध्या फरार) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नमूद दोन आरोपींविरुद्ध गु.र.नं. १३६२/२०२६, कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) व मा. श्री. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/अतुल भोसले, पोउपनि/साईनाथ पुयड तसेच पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, इम्रान शेख, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, संदीप घोगरे, रविकुमार हराळे, अमोल घेवारे (सर्व नेमणूक: स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाचा इशारा: नांदेड जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण करणाऱ्या अशा गैरप्रकारांविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई यापुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.












