नांदेड (प्रतिनिधी: माधव वाघमारे) दिनांक २३ ऑक्टोंबर
नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापारास आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड शहरातील होळी सराफा परिसरातील चंद्रकांत प्लाझा येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका ३३ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली आहे. तसेच जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिला आरोपीसह तिच्या मुलास ताब्यात घेतले आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम आणि ४ मोबाईल फोनसह एकूण ७३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बोगस गिऱ्हाईक पाठवून टाकली धाड
दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) यांना गुप्त बातमीदाराकडून होळी सराफा भागातील चंद्रकांत प्लाझा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अतुल भोसले (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.
दोन शासकीय पंच आणि एका बोगस गिऱ्हाईकाची नियुक्ती करून छापापूर्व पंचनामा करण्यात आला. बोगस गिऱ्हाईकाकडे ५०० रुपयांच्या दोन नोटा देऊन त्यास पंचांसोबत चंद्रकांत प्लाझा येथील घर क्र. 019-059 येथे पाठवण्यात आले. ठरल्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास बोगस गिऱ्हाईकाने पोलीस अंमलदाराच्या मोबाईलवर मिसकॉल देऊन इशारा करताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ घरावर छापा टाकला.
माय-लेकाकडून महिलेचे शोषण
छाप्यादरम्यान तिथे एक ३३ वर्षीय पीडित महिला आढळून आली. तिची विचारपूस केली असता, आरोपी महिला दिपाली किशोर उदावंत (वय ५१ वर्षे) आणि तिचा मुलगा नितीन किशोर उदावंत (वय ३० वर्षे, दोघे रा. चंद्रकांत प्लाझा, होळी सराफा, नांदेड) हे तिला जास्त पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. नितीन उदावंत हा गिऱ्हाईक आणण्याचे काम करत असे, तर दिपाली आणि नितीन हे गिऱ्हाईकांकडून पैसे स्वीकारून त्यातील अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवून घेत असत.
पोलिसांनी पंचांसमक्ष घराची झडती घेऊन रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ७३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे इतवारा येथे गु.र.नं. ३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), ३(५) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ४, ५, ६, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘या’ पोलीस पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविभाग इतवारा) मा. प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ अतुल भोसले, पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मपोउपनि/ अश्विनी गायकवाड, अच्युत मोरे, महिला अंमलदार दिपा कोकाटे (सर्व नेमणूक नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन) यांनी यशस्वी सहभाग घेतला.
पोलिसांचे आवाहन: अनैतिक मानवी व्यापार, वेश्याव्यवसाय किंवा महिलांचे शोषण होणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ नांदेड पोलिसांना किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











