नांदेड दि. २० सप्टेंबर: “नांदेड जिल्हा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १०० टक्के मदत निधी मंजुर करण्यात आला आहे. शासनाने तिसऱ्या टप्यात नांदेडसाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी मंजुर केला आहे. तर खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनींसाठी २० कोटी ८१ लाखांचा निधी दिला जाणार आहे. पीक नुकसानग्रस्त शेतक-यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम विशेष मोहीमेव्दारे सुरु असून मंजुर करण्यात आलेला निधी सोमवारपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याच्या पिंपळगावला भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी कृषीमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यासोबत सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या निधीबाबत माहिती देऊन, सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ६४८,५३३.२ हेक्टर क्षेत्राचा नुकसान झालं आहे. यात जवळपास ७,७४,३१३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील एकूण खरीप हंगाम पेरणी क्षेत्रापैकी अतिवृष्टी व सततचे पाऊसमानामुळे ८६ टक्के क्षेत्रावरील पीके बाधित होऊन नुकसान झालेली आहेत. जिल्हा प्रशासनाने या क्षेत्रावरील पीक व शेत जमीन नुकसानीचे पंचनामे अंतिम केलेले असून त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावात एकूण ५७४ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. नांदेड जिल्हा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्हा दौऱ्यादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर, नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्मावाद, नायगाव, किनवट, माहूर, हदगांव, ही. नगर, भोकर आणि उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायत, बागायत आणि फळ पिकांना मोठा फटका बसला. यात सोयबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, हळद आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यांचसोबत खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनीसाठी एकूण २०.८१ कोटी निधी देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मदत जाहीर करण्यात आली असून शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करण्यााृसाठी युद्धपातळीवर काम करत असल्याचेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमुद केले.
सरकारने अतिवृष्टीतील पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात मदत निधी जाहीर केला आहे. पहिल्या टप्यात जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी 73 कोटी 54 लाख 3 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला असून यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्यात नांदेड जिल्ह्याला 553 कोटी 48 लाख 62 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यात जिरायती पिकांना ८५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांना १७००० रुपये प्रति हेक्टर आणि फळ पिकांना २२५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या राज्यात पंचनाम्यांचं काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे.”
नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड व आमदार बालाजी कल्याणकार यांनी या दौ-यादरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन अतिवृष्टीसंदर्भात चर्चा केली.












