श्रीक्षेत्र माळेगाव दि. 19 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे माळेगाव यात्रेत दरवर्षी पशु-पक्षी स्पर्धा तसेच खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रेत तब्बल सव्वा कोटी रुपये किंमत असलेला उस्मानाबादी जातीचा बोकड भाविक व व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अंबाळी येथील रमाकांत यादवकळे यांनी हा देखणा बोकड विक्रीसाठी माळेगाव यात्रेत आणला आहे. पूर्णतः आकर्षक काळ्या रंगाचा हा बोकड असून, त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगात नैसर्गिकरीत्या उर्दूमध्ये ‘अल्लाह’ असे लिहिल्यासारखे चिन्ह दिसत असल्याची माहिती मालकांनी दिली. या वैशिष्ट्यामुळे हा बोकड यात्रेत चर्चेचा विषय ठरला आहे.
या बोकडाला पाहण्यासाठी यात्रेत आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होत असून, आतापर्यंत २५ लाख रुपयांपर्यंतची मागणी आल्याचे सांगण्यात येते. मात्र, मालक रमाकांत यादवकळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, सव्वा कोटी रुपये किंमत मिळाल्याशिवाय हा बोकड विकला जाणार नाही.
माळेगाव यात्रा पशुव्यापारासाठी प्रसिद्ध असली तरी, इतक्या मोठ्या किमतीचा बोकड प्रथमच यात्रेत दाखल झाल्याने भाविक, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बोकडाच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून, त्याला शेंगदाणा पेंड, सोयाबीन, गहू यांसारखे पौष्टिक खाद्य दिले जाते.
बोकडाच्या विक्रीसाठी विशेष बॅनरद्वारे जाहिरात करण्यात येणार असून, त्याच्या देखण्या रूपामुळे व दुर्मिळ वैशिष्ट्यांमुळे तो माळेगाव यात्रेतील खास आकर्षण ठरत आहे. सध्या बोकड पाहण्यासाठी यात्रास्थळी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.












