नांदेड दि. १ ऑक्टोबर : नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज भोकर तालुक्यात दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तहसीलदार विनोद गुंडमवार व कृषी अधिकाऱ्यांसह त्यांनी थेट शेतात जाऊन सोयाबीन कापणीची पाहणी केली.
कलेक्टरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून हवामानामुळे उभ्या पिकांवर झालेल्या परिणामांची माहिती घेतली. त्यांनी शेतकरी बांधवांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश दिले.
कलेक्टर कर्डिले यांच्या या भेटीमुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाल्याचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये दिसून आले.












