नांदेड १८ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ₹३५,०००/- किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/साईनाथ पुयड व त्यांचे पथक नांदेड शहरात गस्त घालत असताना, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगोली गेट परिसरातील फटाका मार्केटच्या मैदानात एक इसम संशयास्पद रित्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने तात्काळ तेथे पोहोचून संशयिताला ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केली असता त्याचे नाव नवजोतसिंग उर्फ बिद्री प्रकाशसिंग ग्रंथी (वय १९ वर्ष, रा. शाहिदपुरा गेट नंबर ६, नांदेड) असे निष्पन्न झाले. पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सिल्व्हर रंगाचे एक गावठी पिस्तूल (मॅगझिनसह) मिळून आले.
अग्निशस्त्राबाबत कोणतीही वैध परवानगी किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष सदर पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाणे, नांदेड येथे आरोपीविरुद्ध गु.र.नं. ४१५/२०२६ कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई: सदर धडक कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशाने आणि पोनि/ अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, इम्रान शेख, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, संदीप घोगरे, रविकुमार हराळे आणि अमोल घेवारे (सर्व नेमणूक: स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांनी पार पाडली.
नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
विशेष बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे












