नांदेड, दि. ३१ डिसेंबर २०२५ (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिक, निष्ठावंत आणि कर्तव्यदक्ष सेवा बजावणारे पोलीस अधिकारी व अंमलदार आज सन्मानपूर्वक सेवेतून निवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आयोजित समारंभात पोलीस उपनिरीक्षक, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस हवालदार यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पोउपनि ०२, ग्रेड पोउपनि ०१, सपोउपनि ०२ व पोलीस अंमलदार ०२ असे एकूण सात अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले. या सर्वांचा सन्मान पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अविनाश कुमार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी पोलीस दलासाठी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले. “आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेने कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली असून, पुढील आयुष्यात कुटुंबासोबत वेळ घालवून आरोग्याची काळजी घेत सुखी व समाधानी जीवन जगावे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
हा सेवानिवृत्ती समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच पोलीस कल्याण विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोनि/रियाज शेख (वाचक शाखा, नांदेड) यांनी केले. तसेच पोहेकॉ नंदकुमार राठोड, पोहेकॉ/सविता भिमलवाड व पोलीस कल्याण विभागाने कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.
सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांची नावे पुढीलप्रमाणे
- पोउपनि भारत पंढरीराव सावंत – पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड
- पोउपनि मोहम्मद अलीशान काझी – पोलीस ठाणे इतवारा
- ग्रेड पोउपनि आत्मानंद दत्तात्रय वेदपाठक – पोलीस ठाणे अर्धापूर
- सपोउपनि धोंडीबा माधवराव मुंढे – पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड
- सपोउपनि प्रकाश सिताराम पवार – पोलीस मुख्यालय, नांदेड
- पोहेकॉ बाळासाहेब नरबा पंधरे – पोलीस ठाणे हदगाव
- पोहेकॉ वामन दासू राठोड – पोलीस ठाणे लोहा
या सन्मान सोहळ्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला कृतज्ञतेची मानवंदना देत पोलीस दलातील एक गौरवपूर्ण अध्याय संपन्न झाला.












