नांदेड, दि. २ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी) माधव वाघमारे
जिल्हा परिषदेतील सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कामकाज करावे व दिलेल्या वेळेत ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित समन्वय सभेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
या बैठकीस पर्यवेक्षाधीन आयएएस अनन्या रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूर आंदेलवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चेन्ना यांच्यासह पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी, समाजकल्याण, आरोग्य, आयसीडीएस, लेखा, सामान्य प्रशासन, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छ भारत मिशन आदी विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावपातळीवर सुरू असलेल्या विकासकामांना मुदतवाढ देण्यात आली असून, येत्या ३० मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) संदर्भात आढावा घेताना ऑनलाइन घरकुल मंजुरीमध्ये मुखेड, लोहा, नायगाव, कंधार व किनवट हे तालुके मागे असल्याचे निदर्शनास आले. या तालुक्यांनी कामाचा वेग वाढवावा, तसेच पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता लाभार्थ्यांना वेळेत देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करून येत्या १० जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त (ODF Plus) करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देत, प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.












