नांदेड, दि. 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी : माधव वाघमारे)
इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राहूल कर्डिले यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्रास आज भेट देऊन संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी केंद्रावरील शिस्तबद्ध नियोजन, पारदर्शक व्यवस्था आणि कॉपीमुक्त वातावरणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिकांची सुरक्षित साठवणूक, सीसीटीव्ही यंत्रणेची कार्यक्षमता, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा हॉलमधील शिस्त तसेच पर्यवेक्षकांची उपस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी केली. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केलेल्या काटेकोर नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्रीही त्यांनी करून घेतली. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कर्डिले यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांनी याच धर्तीवर नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाच्या या सक्रिय देखरेखीमुळे परीक्षा प्रक्रियेला शिस्त आणि विश्वासार्हतेची नवी उंची मिळत असल्याचे चित्र आहे.












