प्रतिनिधी – माधव वाघमारे
नांदेड/लातूर – नांदेड ११ मार्च पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी रवाना केलेल्या पथकाने नांदेड शहर व लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 94 हजार 760 रुपयांची रोकड आणि अडीच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकाने ११ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर चौकातील ठाकरे कॉम्प्लेक्स आणि सांगवीतील हातोडा चौक या दोन ठिकाणी मटका बुकीवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ६९ हजार ४६० रुपयांची रोकड व ७२ हजार रुपयांचे ७ मोबाईल जप्त केले. याप्रकरणी २० आरोपींना ताब्यात घेऊन विमानतळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
याआधी १० मार्च रोजी सायंकाळी लातूर जिल्ह्यातील देवणी येथे पोलिसांनी कारवाई केली. देवणी येथील बस स्थानकासमोरील डोंगरे कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट व बोरोळ चौक या ठिकाणांवर ऑनलाइन लॉटरी मटका बुकीवर ही कारवाई करण्यात आली. येथून पोलिसांनी २५ हजार ३०० रुपयांची रोकड, ४५ हजार रुपयांचे ९ मोबाईल व ६१ हजार ७०० रुपयांचे लॉटरीचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, देवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शौकत सय्यद करत आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ९४ हजार ७६० रुपयांची रोकड, १६ मोबाईल व इतर साहित्य असा एकूण २ लाख ७३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या यशाबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच 91 50 100 100 या ‘खबर’ हेल्पलाइनवर कळवावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. उमाप यांनी केले आहे.












