भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई
नांदेड दि १० नोव्हेंबर
मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला रंगेहात पकडून त्याच्याकडून २४.०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ३,४८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हेगाराला पकडल्याची घटना
दिनांक ०८/११/२०२६ रोजी दुपारच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने श्रीनगर परिसरात येणार आहे. या माहितीची गांभीर्य घेत गुन्हे शोध पथकाने तात्काळ श्रीनगर परिसरात सापळा रचला. दुपारच्या सुमारास बातमीदाराने दिलेल्या वर्णनानुसार एक संशयित इसम त्या ठिकाणी फिरताना दिसून आला असता, पोलिसांनी पथकाने त्यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश उर्फ पप्पू अशोक कांबळे (वय २५ वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. पालीनगर, नांदेड) असे सांगितले. पंचसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पँटच्या खिशात सोन्याचे दागिने आढळून आले. या दागिन्यांबाबत अधिक विचारपूस केली असता सर्व दागिने चोरीचे असल्याचे त्याने कबूल केले. सखोल तपासात त्याने दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले.
उघडकीस आलेले गुन्हे:
१. पहिली घरफोडी (ज्योतिबा नगर): दिनांक ०२/११/२०२६ रोजी पहाटे ०३.०० वाजेच्या सुमारास छोटू कॉर्नर जवळील ज्योतिबा नगर येथील एका बंद घराचे कुलूप फोडून चोरी केली होती. याप्रकरणी पोलीस ठाणे भाग्यनगर गु.र.नं. ६५१/२०२६ कलम ३३१(3), ३३१(4) ३०५(ब) बी.एन.एस. अन्वेय गुन्हा दाखल आहे. २. दुसरी घरफोडी (तथागत नगर): दिनांक २५/१०/२०२६ रोजी पहाटे ०२.३० वाजेच्या सुमारास तथागत नगर परिसरात घरफोडी करून चोरल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भाग्यनगर गु.र.नं. ६१९/२०२६ कलम ३३१(4) ३०५(ब) बी.एन.एस. अन्वेय गुन्हा दाखल आहे.
पोलिसांची यशस्वी कामगिरी
सदरची कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने मा. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल माळवे, राजीव घुले, रमेश सूर्यवंशी, राहुल लाठकर, अदनान पठान (सर्व नेमणूक पो.स्टे. भाग्यनगर, नांदेड) तसेच नांदेड सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दीपक ओढणे यांनी पार पाडली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले हे करत आहेत.
— प्रतिनिधी: माधव वाघमारे












