नांदेड १७ मे प्रतिनिधी
देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. नांदेड शहरातील विद्युत नगर भागातील एका कदम कुटुंबाची मुली ची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कसून चौकशी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मूळचे अवघे १२० गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला तब्बल ५ लाख रुपयांच्या देवाणघेवाणीतून ५६० गुण मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार या चौकशीतून समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत नगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबियांच्या पाल्याने संबंधित परीक्षेत भाग घेतला होता. अधिकृत मूल्यमापनानुसार या विद्यार्थ्याला केवळ १२० गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र, पेपर फुटी आणि गुणांच्या फेरफार करणाऱ्या रॅकेटशी संधान साधून कदम कुटुंबियांनी तब्बल ५ लाख रुपयांची लाच दिली. या पैशांच्या जोरावर मूळ गुणांमध्ये तब्बल ४०० गुणांची अवैध वाढ करून निकाल ५६० गुण असा लावण्यात आला.
या मोठ्या गैरव्यवहाराचा सुगावा लागताच, सीबीआयच्या पथकाने थेट नांदेड गाठले आणि विद्युत नगरमधील कदम कुटुंबियांच्या घरावर धडक दिली. या कुटुंबाची तासनतास कसून चौकशी करण्यात आली असून, अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि संशयास्पद बाबी सीबीआयच्या हाती लागल्याचे समजते.
आम्ही कसं करायचं? गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल
या धक्कादायक प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
“दिवस-रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून आम्ही अभ्यास करतो. गरीब कुटुंबातील मुलं क्लास लावू शकत नाहीत, तरीही स्वतःच्या जिद्दीवर उत्तम गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण जर पैशांच्या जोरावर १२० चे ५२० गुण होणार असतील, तर आमच्या हुशारीला काय किंमत? गरीबाच्या मुलांनी नक्की करायचं काय?”
एका संतप्त विद्यार्थ्याची प्रतिक्रियापैशांच्या बळावर गुण खरेदी करणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे खरोखरच हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. अशा शिक्षणसम्राटांवर आणि दलालांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणात नांदेडमधील आणखी काही जणांचे हात गुंतले आहेत का? सीबीआयच्या चौकशीत पुढे काय निष्पन्न होते? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.












