प्रतिनिधी १८ ऑगस्ट| माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी दिले होते. या आदेशांनुसार स्थानिक गुन्हे शाखा (LCB), नांदेडच्या पथकाने मोठी कारवाई करत बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि साईनाथ पुयड व त्यांचे पथक नांदेड शहरात फरार आरोपींचा शोध घेत होते. वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, पोलीस ठाणे बारड येथील गुन्हा रजि. क्र. 113/2025 (कलम 309(6), 310, 312 BNS) मधील फरार आरोपी आकाश प्रकाश मोकळे हा चोरीचा मोबाईल विकण्याच्या उद्देशाने मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल परिसरात फिरत आहे.
माहिती मिळताच पथकाने तत्काळ पंचसमक्ष मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल परिसरात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश प्रकाश मोकळे (वय २४ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. नेरली, ता. जि. नांदेड) असे सांगितले.
चाकूचा धाक दाखवून केली होती लुटमार
संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे Vivo कंपनीचा पांढऱ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल मिळून आला. पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर ४ साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीचे साथीदार:
- प्रेम नागेश हटकर
- मयूर उर्फ मोनू लापे (रा. झेंडा चौक)
- अर्पण आटो (रा. सांगवी)
- अनिकेत साहेबराव नरवाडे (रा. छत्रपती चौक, नांदेड)
या सर्व आरोपींनी बारड येथील आंबेगाव पाटीवर थांबून स्कुटीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला अडवले, त्याला चाकूने मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि स्कुटी घेऊन पोबारा केला होता. जप्त करण्यात आलेला मोबाईल (अंदाजे किंमत ₹१५,०००/-) हा याच गुन्ह्यातील असल्याचे पोलीस अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे.
पुढील कारवाई सुरु
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे बारड यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या गुन्ह्यातील इतर फरार साथीदारांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
कामगिरी करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली:
- पोउपनि: साईनाथ पुयड
- पोलीस अंमलदार: बालाजी कदम, इम्रान शेख, प्रमोद जोंधळे, संतोष बेल्लूररोड, रवी हराळे, संदीप धोंगरे व अमोल घेवारे
यांच्या पथकाने पार पाडली.












