प्रतिनिधी : माधव वाघमारे
नांदेड १६ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत आक्रमक आणि धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाच्या मोठ्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल २ कोटी २९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींनी वापरलेल्या बोटी आणि इतर साहित्य घटनास्थळीच जिलेटीनच्या कांड्यांनी ब्लास्ट करून व जाळून नष्ट करण्यात आले.
अशी झाली धडक गुप्त कारवाई
आज, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथक विष्णुपुरी बिट हद्दीत गस्त घालतांना होते. या दरम्यान मौजे वाहेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात लोखंडी बोटी, तराफे व इंजिनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा सुरू असल्याची पक्की गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना सोबत घेऊन नदीपात्रात अचानक छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ७ परप्रांतीय मजुरांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी कल्लाळ व भनगी येथील ४ मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून हा अवैध उपसा करत असल्याचे उघड झाले.
२.२९ कोटींचा जप्त व नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल
कारवाई दरम्यान पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल व त्याचे जागेवर केलेले नुकसान पुढीलप्रमाणे:
- ५ मोठ्या लोखंडी बोटी: (प्रत्येकी ३० लाख रु.) एकूण १,५०,००,०००/- रुपये (जागेवरच जिलेटीनच्या कांड्यांनी ब्लास्ट करून नष्ट)
- ३ लहान बोटी: (प्रत्येकी १५ लाख रु.) एकूण ४५,००,०००/- रुपये (जागेवर नष्ट)
- ३ रेती उपसा इंजिन: एकूण १०,५०,०००/- रुपये (जागेवर नष्ट)
- ३७ पाण्यातील तराफे व ७४ ब्रास रेती: एकूण २२,२०,०००/- रुपये (जाळून व पाण्यात बुडवून नष्ट)
- नदी किनाऱ्यावर साठवलेली ३० ब्रास रेती: एकूण १,५०,००,०००/- रुपये
- एकूण जप्त मुद्देमाल: ₹ २,२९,२०,०००/-
७ परप्रांतीय मजुरांसह ४ सूत्रधारांवर गुन्हे दाखल
घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले ७ मजूर:
- अल्लाऊद्दीन शेख दुखु शेख (वय ३७, रा. साहेबतंज, झारखंड)
- खदीर शेख जुल्लु शेख (वय ३४, रा. साहेबतंज, झारखंड)
- अब्दुल वाहेद मुरुद्दीन शेख (वय ३३, रा. साहेबतंज, झारखंड)
- अखिलेश कुमार धरमदेव राम (वय ३६, रा. सिवान, बिहार)
- उमेशकुमार धरमदेव राम (वय २५, रा. सिवान, बिहार)
- सुनिलकुमार हरदत्त राम (वय १०, रा. सिवान, बिहार)
- शैलेशकुमार धरमदेव राम (रा. सिवान, बिहार)
रेती उपसा करण्यास सांगणारे मुख्य आरोपी (बोटी व साहित्य मालक): 8. मधुकर कळके (रा. कल्लाळ) 9. बालाजी कळके (रा. कल्लाळ) 10. पवन मोरे (रा. भनगी) 11. अनिल मोरे (रा. भनगी)
सदर आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३४३/२०२६ आणि १३४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२, ३(५)), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७)(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९, १५ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ७ अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाळू माफियांना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचा इशारा
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि/ अतुल भोसले, पोनि/ अशोक जाधव, सपोनि/ रवि वाहुळे, सपोनि/ विठ्ठल घोगरे, पोउपनि/ साईनाथ पुयड, पोउपनि/ बाबुराव चव्हाण, पोउपनि/ दासरे, आणि स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस अंमलदारांच्या पथकाने पूर्ण केली.
“नांदेड जिल्ह्यातील नदीपात्रातून बेकायदेशीर उपसा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांची गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशी विशेष मोहीम यापुढेही अविरत सुरूच राहील.” — आशिष सिताराम बोराटे (जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड)












