नांदेड (विशेष प्रतिनिधी) १७ ऑक्टोंबर
नांदेड शहर व परिसरात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मोठी कारवाई करत घरफोडी आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून सोन्या-चांदीचे दागिने व दुचाकी असा एकूण ८,२४,२७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून माळटेकडी स्टेशनवर जाळे
दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) महेश कोरे व त्यांचे पथक नांदेड शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार माळटेकडी रेल्वे स्टेशनजवळ पल्सर २२० मोटरसायकलवर संशयास्पद रित्या उभे असून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकण्याच्या तयारीत आहेत.
माहिती मिळताच पथकाने तातडीने पंचांसह माळटेकडी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही संशयितांना पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) सैयद जाकीर सैयद जफर (वय ३० वर्षे, व्यवसाय: बेकार, रा. महेबुब नगर, नांदेड, ह.मु. धनेगाव, ता. जि. नांदेड) २) शेख नयुम शेख इस्माईल (वय २२ वर्षे, व्यवसाय: बेकार, रा. मातंगवाडा, हिमायतनगर, ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
८ महिन्यांत ७ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली
आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी मागील आठ महिन्यांपासून नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी, मिल्लतनगर, भगतसिंग चौक (सह्याद्री नगर), लईजुईनगर, अशोकनगर (मुखेड) येथे घरफोडी केल्याची, तसेच ओंकारेश्वर नगर व माणिकनगर येथे पल्सर मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून (चेन स्नॅचिंग) नेल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले गुन्हे:
- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे: गु.र.नं. १०२५/२०२६ (मिल्लतनगर) व गु.र.नं. ८३१/२०२६ (भगतसिंग चौक, सह्याद्री नगर)
- विमानतळ पोलीस ठाणे: गु.र.नं. १६५/२०२६ (नंदीग्राम सोसायटी) व गु.र.नं. १४३/२०२६ (ओंकारेश्वर नगर, चेन स्नॅचिंग)
- भाग्यानगर पोलीस ठाणे: गु.र.नं. १०२/२०२६ (माणिकनगर, चेन स्नॅचिंग) व गु.र.नं. २३१/२०२६ (लईजुईनगर)
- मुखेड पोलीस ठाणे: गु.र.नं. २३०/२०२६ (अशोकनगर, मुखेड)
आरोपींकडून जप्त केलेला एकूण ८,२४,२७७ रुपयांचा मुद्देमाल व दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
सदर यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अतुल भोसले, पोउपनि महेश कोरे व पोलीस अंमलदार सुनील गंटलेवार, संघरत्न गायकवाड, माधव माने, श्रीराम दासरे, मनोज राठोड यांनी पार पाडली.
प्रतिनिधी: माधव वाघमारे












