प्रतिनिधी माधव वाघमारे
१८ ऑक्टोंबर नांदेड : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात ग्रामीण गृहनिर्माण अभियंते म्हणून काम करणाऱ्या अनेक अभियंत्यांचे काम अस समाधानकारक असल्याचे आढावा बैठकीत आढळले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी निष्क्रिय ठरलेल्या १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी घेतलेल्या या धडाकेबाज निर्णयामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत काम करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी २३ ऑगस्ट २०२६ रोजी आढावा बैठक घेतली होती. सदर बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी घरकूल योजनेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे आढळून आले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अहवाल ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन संचालक यांच्याकडे पाठविला होता. ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी ग्रामविकास विभागास एका वर्षात १५ लाख घरे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
सन २०२६-२७ या वर्षात नांदेड जिल्ह्यासाठी १ लाख ३८ हजार ९६२ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. सचिव, ग्रामविकास विभाग व पंचायतराज यांच्याकडून दरमहा घरकूल योजनेचा आढावा घेतला जात होता. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना सविस्तर सूचना देऊन दररोज किमान १५ घरकुले पूर्ण करावीत असे निर्देश दिले होते. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आढावा बैठक घेऊन कामात सुधारणा करण्याबाबत वारंवार संबंधितांस निर्देश देण्यात आले होते.
परंतु, ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या कामात काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे काम अस समाधानकारक असलेल्या अभियंत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेची घरकुल पूर्ण करण्याचे काम अत्यंत अस समाधानकारक असल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई झालेल्या अभियंत्यांची नावे
- लोहा तालुका: प्रशांत कांबळे, तुकाराम कदम, सुमित साखरे, शहाजी शिंदे, सचिन माने, प्रताप वडवळे, शिवाजी वजिरे
- किनवट तालुका: प्रमोद सावते, बुद्धभूषण पठाडे, विलास चव्हाण
- नायगाव तालुका: बाळासाहेब वनंजे चेतन वनंजे
- बिलोली तालुका: धम्मपाल निकाळजे, अख्तर रजा उल रहमान, आबेद शादुल्ला शेख
दररोज १५ घरकुलांचे उद्दिष्ट अपूर्ण
नांदेड जिल्ह्यात कार्यरत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी दररोज किमान १५ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून कोणत्याही ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याने १५ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले नाही. जिल्ह्यातील एकूण ११७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांपैकी सर्वात कमी उद्दिष्ट साध्य केलेल्या १७ अभियंत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी त्यांना कार्यमुक्त केले असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने सर्व संबंधित अभियंत्यांवर कारवाई केल्याचे लेखी कळविले आहे. घरकूल कामांचा वेळोवेळी आढावा घेऊनही सुधारणा न झाल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून, नवीन १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित एजन्सीला कळविण्यात आले आहे.












