प्रतिनिधी माधव वाघमारे दिनांक २५ ऑक्टोंबर
नांदेड: अमली पदार्थांवविरोधात पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई आबाडी परिसरात छापा टाकून पोलिसांनी अवैध अमली पदार्थांची चोरीटी विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून ३ किलो ६०८ ग्रॅम वजनाचा गांजा आणि १,८०,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ रवि वाहुळे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, शिवाजीनगर हद्दीत काही इसम एन.डी.पी.एस. कायद्याच्या तरतुदींचा भंग करून अमली पदार्थ (गांजा) स्वतःजवळ बाळगून विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडून कायदेशीर कारवाईची परवानगी घेऊन, राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच व फोटोग्राफर यांना सोबत घेऊन छापा टाकण्यात आला.
असा सापडला मुद्देमाल व आरोपी
दुपारच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील नई आबाडी येथील भाजी मार्केटमधील सिमेंट रोडवर पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. त्या Il तपासात वर्णनाप्रमाणे दोन इसम पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले: १. शेख अनीस शेख सलीम (वय ३२ वर्षे, व्यवसाय- ऑ ऑटो चालक/मजुरी, रा. दातार चौक, नांदेड) २. सय्यद फेरोज सय्यद मुबारक (वय ४५ वर्षे, व्यवसाय- भाजीविक्री/मजुरी, रा. दातार चौक, नई आबाडी, नांदेड)
राजपत्रित अधिकारी व पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील नायलॉनच्या पोत्यात व निळ्या कॅरीबॅगमधे उग्र वास येणारी पाने, बिया व फांद्या असलेला ३ किलो ६०८ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. फॉरमॅन्स टीमने खात्री केल्यानंतर इलेक्ट्रिक काट्यावर वजन करून (प्रती किलो ५०,०००/- रुपये दाराप्रमाणे) एकूण १,८०,४००/- रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल व यशस्वी पथक
सदर प्रकरणी सपोनि/ रवि वाहुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५७/२०२६ कलम ८(क), २०(ब), ११(ब), २९ एन.डी.पी.एस. कायदा अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि रवि वाहुळे व पोलीस अंमलदार गुंडेराव करले, दारासिंग राठोड, चंचलवार, देविदास चव्हाण, मोहन हाके, शेख उमर, मोतीराम पवार, आबाराव पिंगलवाड, सिद्दार्थ सोनसळे आणि फोटोग्राफर शुभम श्रीभाते यांच्या पथकाने पार पाडली आहे.












