- प्रतिनिधी: माधव वाघमारे
- नांदेड, २५ ऑक्टोबर २०२६
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगोली गेट ब्रिजजवळील ‘KF Enterprises’ या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चंद्रकांत दगडूजी शिंदे (वय ४० वर्षे, रा. माळकोठा, ता. मुदखेड, जि. नांदेड) या शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याची अत्यंत दुर्दैवी व खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अपहरण करून दोन दिवस डांबून ठेवले
मृत शेतकऱ्याची पत्नी श्रीमती ज्योती चंद्रकांत शिंदे (वय ३७ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास माळकोठा गावातील मारोती मंदिराराजवळून दोन अज्ञात व्यक्तींनी मयत चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेड येथील खालसा फायनान्सच्या कार्यालयात आणले. तिथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा खून झाला. या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १४०(१), १४०(२), १४२, १२७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची त्वरित कारवाई; तीन आरोपी ताब्यात
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलीस ठाण्याची विशेष पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अटकेची पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे:
- जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड (वय २२ वर्षे, व्यवसाय – खाजगी नौकरी, रा. गोपाल चावडी, सिडको, नांदेड)
- शेख आमेर शेख साहेबहुसेन (वय २५ वर्षे, व्यवसाय – खाजगी नौकरी, रा. मलंग बाबा बिल्डिंग जवळ, खुदबे नगर चौरस्ता, देगलूर नाका, नांदेड)
- इम्रान खान शाहबाज खान (वय ४० वर्षे, व्यवसाय – खाजगी नौकरी, रा. बुन्हाण मशिद जवळ, गोवर्धन घाट, नांदेड)
या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा विशेष पथकांद्वारे कसून शोध घेतला जात असून, या गुन्ह्याचा पुढील तपास वजिराबाद पोलीस करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कर्जवसुली किंवा फायनान्स कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर त्रास, धमकी किंवा दबाव येत असल्यास शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी घाबरून किंवा भावनेच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कळवावे. तक्रार मिळाल्यानंतर कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.











