नांदेड, दि. २० डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत आज शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना धर्माबाद येथील इनानी मंगल कार्यालयात काही मतदारांना कोंडून ठेवल्याबाबत प्रसारमाध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या. या वृत्तांची प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली.
सदर घटनेच्या अनुषंगाने धर्माबाद येथील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा स्वामी तसेच पोलीस निरीक्षक श्री. सदाशिव बडीकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी व तपासणी केली. तपासादरम्यान इनानी मंगल कार्यालयात जमावबंदी आदेश व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकावर कायद्याने फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा स्वामी यांनी दिली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त, नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.












