नांदेड १७ ऑगस्ट / मुखेड (विशेष प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार मुखेड पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक आणि ५ ब्रास रेती असा ₹४०,२५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
१५ ऑगस्ट २०२६ रोजी मुखेड पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त घालत होते. या दरम्यान मारतळा ते मुखेड जाणाऱ्या रस्त्यावरून एका टाटामधून (हायवा ट्रक क्र. MH-12 QW-7022) बेकायदेशीररीत्या रेतीची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहनाची तपासणी केली असता, त्यात ५ ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना अथवा महसूल भरल्याची कागदपत्रे नव्हती. शासनाची रॉयल्टी चुकवून ही वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.
जप्त केलेला मुद्देमाल:
- टाटा कंपनीचा हायवा ट्रक (क्र. MH-12 QW-7022): किंमत ₹४०,००,०००/-
- पाच ब्रास रेती: किंमत ₹२५,०००/-
- एकूण जप्त मुद्देमाल: ₹४०,२५,०००/-
चालक व मालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी चालक बापूराव देवराव राठोड (वय ४० वर्षे, रा. फुलमळा तांडा, ता. लोहा) आणि हायवा मालक श्रीकांत व्यंकटराव ढगे (रा. मारतळा, ता. लोहा) यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे मुखेड येथे गुन्हा क्रमांक 260/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुखेड पोलीस करत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/तुतूरवाड, पोहेकॉ/नामदेव गिते आणि गोटे (सर्व नेमणूक पोलीस स्टेशन मुखेड) यांच्या पथकाने पार पाडली.
“अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील,” असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रतिनिधी माधव वाघमारे












