नांदेड १६ ऑगस्ट (प्रतिनिधी : माधव वाघमारे) मराठा आरक्षणाच्या लढ्यातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मराठा समाज पूर्णपणे सक्रिय झाला आहे. या दौऱ्यात होणाऱ्या जाहीर सभेच्या प्रचाराचा आणि गावपातळीवरील जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज वाघी (ता. नांदेड) येथे महिला भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून मोठ्या उत्साहात करण्यात आला.
२० ते २५ ऑगस्टदरम्यान मराठवाडा दौरा
मराठा आरक्षणासाठी आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील वादळी दौऱ्यानंतर आता दि. २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत त्यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना आंदोलनासाठी सजग करण्यासाठी गावपातळीवर चावडी बैठका व कोपरा सभांचे आयोजन केले जात आहे.
महिला भगिनींचे नेतृत्व अन् गावागावांत संवाद
वाघी येथून सुरू झालेल्या या जनजागृती अभियानात मराठा महिला भगिनींनी पुढाकार घेत कंबर कसली आहे. आज पहिल्याच दिवशी वाघी, भानपूर, सायाळ आणि दर्यापूर या गावांमध्ये प्रचार-प्रसार करण्यात आला. घरोघरी आणि गावच्या चावडीवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधून आगामी दौरा व आंदोलनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
एकजुटीने आणि शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचे आवाहन
“मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्याला ताकद देण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील बांधवांनी, महिलांनी आणि तरुणांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता, पूर्णपणे एकजुटीने आणि शांततेच्या मार्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे (समन्वयक)
प्रमुख उपस्थिती
या प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी महिला नेतृत्वासह मराठा सेवकांची मोठी उपस्थिती होती.
- महिला प्रतिनिधी: अरुणाताई जाधव, राणीताई दळवी, शुभलक्ष्मी ताई सूर्यवंशी, वनिताताई देवसरकर, कल्पनाताई चव्हाण, अर्चनाताई होगे, ज्योतीताई शिंदे, रेखाताई पाटील, रत्नमाला जाधव, अनिताताई पावडे.
- मराठा सेवक व नागरिक: बालाजी नावंदे, अजिंक्य लोंढे, सुधीर देशमुख, शिवशंकर भोसले, सुनील सूर्यवंशी, सुनील सायाळकर, अर्जुन घोगरे, घोगरे सर.
यावेळी वाघीसह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाल-गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा आणि सभा ऐतिहासिक रीतीने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.












