नांदेड २१ ऑगस्ट प्रतिनिधी
नांदेड शहर व जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि बेकायदेशीर धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई करत मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या एका आरोपीला अटक करून १,२४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर दुसऱ्या कारवाईत विनापरवाना धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एकास ताब्यात घेतले आहे.
कारवाई १: १.२४ लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरटा जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) रवी वाहुळे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्रावस्तीनगर परिसरात सापळा रचून आरोपी शेख फुरखान उर्फ कालु शेख नयुम (वय २१ वर्षे, रा. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे असलेल्या विनानंबरच्या पल्सर मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता, ती अर्धापूर येथील मदिनानगर येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७४/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे. अधिक चौकशीत आरोपीने विविध ठिकाणांहून मोबाईल चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून १ पल्सर मोटारसायकल आणि ७ मोबाईल फोन असा एकूण १,२४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाई २: २ तलवारी व खंजीर जप्त; विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दुसऱ्या एका कारवाईत, पेट्रोलिंगदरम्यान नमस्कार चौक परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्या सुनील बबनसिंग ठाकूर (वय ३२ वर्षे, रा. गजानन सोसायटी, नमस्कार चौक, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून प्रत्येकी २,००० रुपये किमतीच्या २ लोखंडी तलवारी आणि ५०० रुपये किमतीचा १ लोखंडी खंजीर (एकूण ४,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल) जप्त करण्यात आला.
परवाना नसताना घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलीस अंमलदार देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८९/२०२६ कलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
यांच्या पथकाने केली कामगिरी: सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सपोनि रवी वाहुळे, पोउपनिरिक्षक माधव केंद्रे, बळीराम दसरे, पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, दिलीप चंचलवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, मिलिंद नरबाग आणि सायबर पोलीस स्टेशनचे राजू सिटीकर, दीपक ओढणे, रेश्मा पठाण यांनी पार पाडली.
प्रतिनिधी माधव वाघमारे












